असंच देश सोडून परदेशात स्थायिक झालेल्या काही मित्रांच्या बाबांची कहाणी....
भांबावला असेलही अंगणात वारा
पावसाला डोळ्यांमधे सापडेल थारा
दूरदेशी घड्याळाला लागेलही वेध
दोन डोळे थकलेले भासतील मेघ
एकटाच कुठे कुठे बरसेल थोडा
गालांवर ओघळेल मोतीदार सडा
बदलेल कुस रात्री, ओलावेल उशी
आठवून जुने काही, हसेलही मिशी ...
दचकेल मधुनच चाचपेल फोन
जग सारे निजलेले .. सापडेल कोण ?
"बाळा दूर गेलास तू", म्हणेल मनात
हुरहूर दाटलेली सांगेल कुणास ?
जेवताना रोज रात्री अडकेल घास
’डोके दुखते’ सांगुन सोडेल तो ताट
तारखांच्या गणितात मोजेल दिवस
नातवाशी खेळायाला लागलेला ध्यास
दिवसांचे थवे कसे हळू सरकती
आठवांच्या रात्री कोण लाविते पणती ?
नको नको वाटेलही ... सांगेल कुणाला ?
सावलीचा स्पर्श कसा लाभावा उन्हाला ?
तळपत तळपत थकतील पाय
सरकत सरकत, दिवसही जाय
दाही दिशा कोंडलेल्या अंधारती जणू
क्षण क्षण निसटता लागलेला कण्हू
............................................
मलासुद्धा वाटे बाबा निघोनिया यावे
पुन्हा जुने खेळ काही नव्याने मांडावे
अडकलो आहे पण .. सुटायाचे कसे ?
तुझे माझे दोघांचेही झाले आहे फसे ...
संतोष (कवितेतला)

No comments:
Post a Comment