Sunday, April 27, 2008

नुकताच

नुकताच संपला वारा
नुकतेच रान अंताशी
नुकताच दाटला कंठ
नुकतेच गान ओठाशी

नुकतीच निघुन गेली तू
मी आत सांडले आसू
पण तुला निरोप देतांना
नुकतेच वाहिले हासू

नुकतीच कविता स्फुरली
नुकतेच शब्द मी गिळले
काहीसे सुचले होते
पुर्वेला पश्चिम जुळले

नुकतेच नको म्हणतांना
नुकताच बरसला मेघ
मी फक्त मोजका भिजलो
गालांवर ओली रेघ..


संतोष (कवितेतला) ९८८११५८८४५

संतोष (कवितेतला)

अश्रु ओघळले
स्वप्ने जाळत मनातली
पाणी देखील वाढवते आग कधी कधी
आसवांनी वाढवली आग काळजातली
हातात उरलेला मधुमासांचा गोंधळ
उजेड पसरलेला साऱ्या जगात
आत मात्र धुसमुसणारी काजळ
विसरलीस तु, पण मी नाही..
मला आठवते अजुन ती संध्याकाळ
दाटलेले मेघ, वाऱ्याचे कुजबुज
तुझ्या मनातले माझे गुज
आता उरलेला चुरा सुकलेल्या मेंदीचा
मनात कधी निनादलेला सुर
आता शब्दच बेसुर
मोल सरलेले अश्रु
लक्ष्य संपलेली वाट, हरवलेली पहाट
खोल उरलेली रातच फक्त
अश्रुत भिजलेली, हसु सरलेली
विसरलीस तु, पण मी नाही..

संतोष (कवितेतला) ९८८११५८८४५



ना उपाधी प्रेमाची
ना आर्त हाक
तु आदिपासुन अंतही माग
मी नव्हतो कधीच तुझा,
तु माझी तरीही कविता माग..
तु पापणी माझी
मी डोळ्यात सुकलेला अश्रु फक्त
तु चोरलेले सुर माझे,
मी अर्पण केलेले गीत तुला
तु अजुन माग ओवी माझी
तु अजुन माझी गाणी माग
तु आदिपासुन अंतही माग
जगलो मीही, जगलीस तुही
मी उरलो एकतर्फी,
तु दुतर्फा वाहणारी नदीच जणू
मी दगड तुझ्या वाटेतला
पण मला ओलंडतांना खळखळणारी तु..
तु तरीही माग आयुष्य माझे
माझ्या मनात गोंदलेली ओळ माग
तु आदिपासुन अंतही माग..



संतोष (कवितेतला) ९८८११५८८४५